title-unknown
बघता बघता एक प्रकाशमान दिवस, अंधाऱ्या रात्रीत विलीन होतो.
बघता बघता एक ऋतू नव्या ऋतूत परिवर्तित होतो.
बघता बघता एक नदी अथांग सागरात समर्पित होते.
बघता बघता नीरव शांतता चक्रीवादळात भोवरा बनते.
बघता बघता लागलेली ओहोटी,
उसळत्या लाटांसंगे भरतीने खळाळते.
बघता बघता शांत भासणाऱ्या धरतीतून,
उद्रेकाचा ज्वालामुखी उसळून येतो.
बघता बघता रडवे अश्रू, हसू बनून गालावर खेळतात.
बघता बघता होत्याचे नव्हते होते,
आणि नव्हत्यातून काही नव्याने प्रकटते!
काळ बदलतोय, वेळ बदलतीय,
ऋतू बदलतायत, दिवस पालटतायत,
या बदलाच्या वरदानाचा साक्षी बन,
अन जागा हो खडबडून,
नको रडूस , नको रुसूंस,
नको खचूस, नको खंतावूस, कवटाळून घे प्रत्येक क्षणाला...
साजरा कर भरभरून, निरोप दे त्याला समाधानाने हात धरून,
एकेक पाऊल पुढे जा, नव्या अनुभवाला सामोरे जाण्यासाठी...
नव्या वाटेला आजमावण्यासाठी, स्वतःला जोखण्यासाठी!
आणि
हरेक क्षण , क्षणभंगूरता, परिवर्तन समजून उमजून,
सजगतेने जगण्यासाठी, हा मनुष्य जन्म सार्थकी लावण्यासाठी!

