title-unknown-22
title
वैधानिक ईशारा: सदर कविता केवळ मनोरंजनासाठी आहे; कृपया कोणी राग मानू नये!
आपण बालपणीचे सवंगडी ना, मी सुदामा तू कान्हा
मग आता तरी वेळात वेळ काढून भेट ना
केंव्हाची तुझ्या भेटीची ओढ लागली रे मना
आता तरी क्षमा कर आणि माफ केले म्हण ना रे कान्हा
मूठभर पोह्यांच्या लालसेने तुझ्याशी लटके बोललो होतो
क्षणभराच्या क्षुधातृप्तीसाठी तुझ्याशी खोटे वागलो होतो
अजाणता झालेल्या त्या चुकीला विसरून जा ना दयाधना आता
तुझा विरह नाही सहन होत रे मुरलीधरा आता
थकलो रे वासनांची क्षुधा पुरवता पुरवता
मीटलो रे अपेक्षांची ओझी वाहता वाहता
कितीही भरला तरी संसाराचा घडा भारता भरेना
अशांत अस्वस्थ या जीवाला आराम मिळता मिळेना
युगें न युगें तू मुरली वाजवत आलास
गोपी आणि सवंगड्याना रिझवत आलास
वाचले होते मी केंव्हातरी सुद्याम्याला तू परत भेटलास
त्याच्या पायातले काटे काढून आराम दिलास
त्याच्या पुरचुंडीतल्या पोह्यांना स्वीकारून त्याला कृतकृत्य केलेस
अन अविनाशी वैभवाचे अनंत काळापर्यंत धनी बनवलेस
मला खात्री आहे तू मला भेटणार आहेस
माफ करून प्रेमभराने माझे सांत्वन करणार आहेस
आपल्या बालपणीच्या निष्पाप मैत्रीला तू जगणार आहेस
मैत्रीची ही कथा जगाच्या इतिहासात अजरामर करणार आहेस
अश्या अनेक तुटलेल्या मैत्र्यांना उभारी देण्याची आस तू देणार आहेस
खऱ्या मित्रप्रेमाच्या नात्याला खास असे वरदान तू देणार आहेस!

