title-unknown-2
title
काही लोकं जिभेला तलवारीसारखे चालवतात,
आणि स्वतःच्या मनातल्या बेचैनीने,
दुसऱ्यांच्या मनांवर सपासप वार करतात.
काही लोकं जिभेला चाबकाच्या फटकाऱ्यांप्रमाणे वापरतात,
आणि स्वतःच्या मनातील अस्वस्थतेने,
दुसऱ्यांच्या आनंदाला गढुळवून टाकतात.
काही लोकं जिभेला तोफेप्रमाणे वापरतात,
धडाधड शब्दांचे बॉम्ब टाकून,
अनेक नाती उध्वस्थ करून टाकतात.
काही लोकं तलवार, चाबूक आणि तोफांच्या भडिमाराला बळी पडतात,
मग स्वतः देखील तशीच कला आत्मसात करतात,
आणि अशाच आयुधांनी विष पसरवत राहतात...
तर काही लोकं कानांना आणि मनांना ' कवचकुंडलें ' वापरतात,
या विषारी आयुधांच्या भडीमारावर मात करतात .
इतकेच नव्हें तर ते अनेकांना ही ‘कवचकुंडलें’ वाटून वापरायला शिकवतात .
एकदा "कवचकुंडले" धारण केलीत की मग तिळासारखे मितभाष्य करतात,
गुळासारखी मधुरता त्यांच्या जीवनाचा आनंद द्विगुणित करते.
शब्द आणि आवाजाच्या अविष्कारांसाठी जिभेचा वापर करतात,
हळुवारपणे अनेक हृदये जिंकून घेतात, आनंदाची शिंपण करतात !
अशी जादूमयी “कवचकुंडले” तुम्हां आम्हां लाभोत हीच शुभकामना !
सुरेखा

