title-unknown-17
title
तुपाचे निरांजन, टाळ्यांचा गजर
समईची निश्चल ज्योत, सुगंधी फुलांचे हार
घंटानादाची ललकार, धुपाचा घमघमाट
प्रसन्नतेचा अविष्कार, नैवेद्याचा थाट
श्लोकांचे आवर्तन, त्यांचे लयबद्ध उच्चारण
भक्तीने घातलेली साद आणि त्याला केलेले पाचारण
संकल्पसिद्धीसाठी केलेली पूजा, यथाशक्ती यथामती
म्हणजे छोट्या तेजाने, महातेजाची केलेली आरती
त्या दिव्य तेजाची ओळख स्वतःमध्ये शोधायची
अन एकदा ओळख पटल्यावर त्यालाच समर्पित करायची
कर्तव्य कर्मांची सातत्याने अर्पण करायची आहूती
स्वतःच्याही पलीकडे जाऊन करत राहायची कृती
पण जरी लगेच मिळाली नाही पोच पावती
तरी अढळ विश्वास, हीच त्याच्यावरची खरी प्रिती
अशा या प्रितीची झलक तरी तुम्हा आम्हां लाभो
छोट्या तेजाने, महातेजाच्या केलेल्या आरतीने
आपले जीवन उजळवून टाको आणि सुफळ संपन्न होवो
हीच ईश्वर चरणी विनंती !

