title-unknown-16
title
निश्चिन्त हो, निःशंक हो, निर्भय हो रे माझ्या मना
लाभू दे अलौकिक, अलभ्य, अक्षय आनंदाचा खजिना
अंत हो यातनांचा, नाश हो चिंता काळज्यांचा
होऊ देत दिव्य साक्षत्कार विश्व व्यापक चैतन्याचा
अनंत या विश्वाला कवटाळ्ण्याची स्फूर्ती लाभो
निरभ्र या नभी, उत्तुंग झेपवण्याची उर्मी जागो
सारे विश्व माझे केवळ, प्रेमरंगात रंगून जावो
अंतरंगी, तेजाळ रवीकिरणांसम प्रकाश जागो
ढगाळलेल्या, निराश, अशांत, उद्वीग्न मनांत
शुभ्र निरभ्र आकाशाच्या प्रतिबिंबाची साक्ष उजळो
गोठलेल्या अंधाऱ्या निराधार काळोखाला
लखलखत्या चांदण्यांची, उबदार कूस मिळो
नित्य नव्या क्षणांना नूतनतेचे वरदान लाभो
मुग्ध अनभिज्ञ कळ्यांत अस्मितेची जाण जागो
तुझ्या आळवणीतून आराधनेतून जीवनलेणे साकार होवो
जीवनाचा अनंत अक्षय स्त्रोत निश्चिन्ततेने व्यक्त होवो
लयीला विलीन करतो, अभिशापातून उगम पावतो
उत्पत्ती,स्थिती,लयीच्या जाणिवेतून नव्या संवेदनेला जाग देतो

